Thursday 5 February 2015

कर्दळीवन : भंपकपणाचा कळस

कर्दळीवन : भंपकपणाचा कळस
                                                        - रोहन विजय उपळेकर
 
                १. कलियुगाचे अगदी तंतोतंत वर्णन पुराणांमध्ये व संतांच्या वाङ्मयामध्ये बघायला मिळते. कलियुगात असत्यच सत्याची जागा घेऊन लोकांना भ्रमित करेल, असे त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे. याचा आपल्याला पदोपदी प्रत्यय येत असतो. याच भंपकपणाचा कळस म्हणजे सध्या चर्चेत असलेली कर्दळीवन यात्रा होय.
श्रीगुरुचरित्र या परमपवित्र ग्रंथात भगवान श्रीदत्तप्रभूंच्या कलियुगातील, भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराज व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज, या दोन अवतारांच्या लीला सविस्तर वर्णिलेल्या आहेत. आज ५०० हून अधिक वर्षे या ग्रंथाची सेवा हजारो लोक करीत आहेत.
संतांचे वाङ्मय हे वरकरणी सोपे वाटत असले तरी त्यात खूप गूढार्थ भरून राहिलेला असतो. सर्वसामान्य वाचकांना त्याचा मथितार्थ प्रत्येकवेळी कळेलच असे नाही. किंबहुना सद्गुरुकृपेने अंतर्दृष्टी उघडल्याशिवाय त्या शब्दांचा खरा अर्थ उमगतच नसतो. अशी दृष्टी नसलेल्या अभ्यासकांद्वारे मग संतवचनांचे विपरित अर्थ लावले जातात. सध्याच्या काळात असल्याच प्रकारचे धेडगुजरी अभ्यासक समाजात फार मोठ्या प्रमाणात तयार झालेले असल्याने असे अयोग्य अर्थच प्रचलित होताना दिसत आहेत. शिवाय काही गोष्टी संत मुद्दामूनच गुप्त ठेवतात किंवा अर्धवट अर्थ सांगून ठेवतात. त्यामुळेही  लोक विपरीत अर्थ करतात. कर्दळीवनाच्या बाबतीत हेच झालेले दिसून येत आहे.
श्रीगुरुचरित्राच्या ५१ व्या अध्यायात भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्याचा उल्लेख येतो. श्रीस्वामी महाराजांनी गाणगापुरातून शैल्याला गमन केले व पाताळगंगेत पुष्पांच्या आसनावर बसून त्यांनी आपला दिव्यदेह अदृश्य केला. लौकिक अर्थाने त्यांनी 'कर्दळीवनात गमन केले' असे तेथे म्हटलेले आहे. येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी की, भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी व भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. ते केवळ अदृश्य झालेले आहेत !
 
                २ . शैल्यमल्लिकार्जुनाजवळ पाताळगंगेच्या पैलतीरावर एक घनदाट जंगल असून त्यात खूप केळीची झाडे आहेत. तसेच तेथे चिखल, दलदलीचेही साम्राज्य आहे. कदली या संस्कृत शब्दाचा अर्थ केळी. तसाच त्याचा तेलुगु भाषेत अर्थ दलदल देखील. त्यामुळेच या अरण्याचे नाव 'कदलीवन' असे पडले. पूर्वीचे कर्दळीवन आता तसे राहिलेले नाही. कारण कृष्णामाईवर झालेल्या नागार्जुनसागर या प्रचंड धरणामुळे बराचसा भाग आता पाण्याखाली गेलेला आहे.
 
                ३. या कर्दळीवनात वामचारी बौध्द तांत्रिक तसेच शाक्त व कापालिकांचा अड्डा होता. आजही त्यांचा वावर तेथे आहेच. बौध्दांपैकी रससिध्द नागार्जुन याच प्रदेशात राहात होते. त्यांनी त्यांचे अनेक औषधी प्रयोग याच ठिकाणी केलेले आहेत. आद्य शंकराचार्य स्वामींच्या चरित्रातील कापालिकाचा प्रसंगही याच जंगलात घडलेला आहे. तांत्रिकांची अघोरी पंचमकार साधना या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने, सात्त्विक भक्तांनी, उत्तम लक्षणी संन्यासी लोकांनी या ठिकाणी अजिबात जाऊ नये, असा शास्त्रांचा स्पष्ट निर्देश पूर्वी प्रचलित होता. एखादा सुलक्षणी उत्तम पुरुष अशा  भागात गेला तर ते तांत्रिक लोक त्याला पकडून त्याचा बळी आपल्या इष्ट देवतेला देत असत. कापालिकाने बळी देण्यासाठीच श्रीमदाद्य शंकराचार्यांना तेथे आमंत्रित केलेले होते. पण भगवान श्रीनृसिंहांनी श्रीपद्मपादाचार्यांच्या देहाचा आश्रय घेउन कापालिकाचा शिरच्छेद केला होता. अशा ठिकाणी, शास्त्रांचे स्पष्ट निर्देश डावलून श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तपश्चर्येसाठी जातील, असे अजिबात वाटत नाही.
 
                ४. काही जुन्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख येतो की, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे तपश्चर्या केली. लाकूडतोड्याच्या वारुळावरील घावाचे निमित्त होऊन तेच त्या वारुळातून श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रकटले. श्रीदत्त संप्रदायाच्या मूळ परंपराशाखांमध्ये या गोष्टीला अजिबात प्रमाण मानत नाहीत. ही काल्पनिक असल्याचेच अनेक महात्म्यांचे म्हणणे आहे व त्याला तसे भक्कम पुरावेही आहेत.
 
                ५. राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या जन्मासंबंधी त्यांचे प्रमुख शिष्योत्तम श्रीस्वामीसुत महाराजांना जो दृष्टांत झाला होता, त्यानुसार हरियाणा राज्यातील हस्तिनापुर जवळील छेली या खेडेगावात केळीच्या वनाजवळ, चैत्र शुध्द द्वितीया, शके १०७१ म्हणजेच इ.स. ११४९ साली धरणी दुभंगून आठ वर्षाच्या बटू रुपात श्रीस्वामीमहाराज प्रकटले होते. बव्हंशी स्वामीशिष्य याच घटनेला सत्य मानतात. गोपाळबुवा केळकरांच्या बखरीतही हाच प्रसंग आहे. यानुसार अहमदनगरच्या नानाजी रेखी यांनी श्रीस्वामी महाराजांची पत्रिका तयार केली होती. त्या पत्रिकेला स्वतः श्रीस्वामी महाराजांनी मान्यता दिलेली होती. श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपांकित, प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वतः श्रीस्वामींनीच सांगितलेले होते की, "सख्या, याच देहातून आम्ही गेली आठशे वर्षे कार्य करीत आहोत !"
याचा अर्थ असा की, श्रीस्वामी समर्थ महाराज हे भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्याही आधीपासून, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामींच्या काळापासूनच कार्य करीत आहेत. त्यामुळेच कर्दळीवनात घडलेल्या वरील घटनेला संप्रदायामध्ये मान्यताच नाही. ती केवळ कविकल्पनाच आहे. श्रीदत्त संप्रदायाच्या अवतारक्रमामध्ये, श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी हे प्रथम अवतार, श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे द्वितीय अवतार, श्रीस्वामी समर्थ महाराज हे तृतीय अवतार,  श्री माणिकप्रभू हे चतुर्थ अवतार व प.प.श्री. टेंब्येस्वामी हे पंचम दत्तावतार मानले जातात. हा अवतारक्रम त्या अवतारांच्या जन्मकालावर आधारित नाही.
वरील पाचही अवतार हे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचेच परिपूर्ण स्वरूप असले तरी त्या प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये खूप फरक आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज हे वेदशास्त्रांचे कट्टर पुरस्कर्ते आणि कोणतीही शास्त्रविरुध्द गोष्ट कदापि न मानणारे होते. या उलट श्रीस्वामी समर्थ महाराज हे कायमच शास्त्रांना पूर्णपणे बाजूला ठेवून मनःपूत आचरण करणारे होते. ते सर्वतंत्रस्वतंत्रच वागत असत. या दोन्ही अवतारांची ही वैशिष्ट्ये त्यांच्या लीलांमध्ये स्पष्टपणे जाणवतात. एकाच रुपात  अशी सर्वथा भिन्न किंवा विरुध्दधर्मी वैशिष्ट्ये कशी काय राहू शकतील? त्यामुळेच श्रीनृसिंहसरस्वती स्वामीच श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या रुपाने पुन्हा कार्यार्थ आले, ही गोष्ट पटत नाही. हे दोन्ही अवतार भिन्नच आहेत.
श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या अनेक लीलांमध्ये, गाणगापूरला राहून काम्यार्थ उपासना करणा-या भक्तांना स्वतः श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी दृष्टांत देऊन अक्कलकोटला पाठवले व त्यांचे कार्य श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने पूर्ण झाले; अशा असंख्य लीला आहेत. आम्ही आणि श्रीस्वामी समर्थ महाराज एकच आहोत असेही त्या दृष्टांतांमध्ये सांगितलेले आढळते. तत्वदृष्ट्या हे खरेच आहे कारण दोघेही श्रीदत्तप्रभूंचेच अवतार आहेत. पण श्रीनृसिंहसरस्वती स्वामीच श्रीअक्कलकोट स्वामींच्या रूपाने पुन्हा आले, ही गोष्ट मात्र पटणारी नाही.
 
                ६. आता आणखी एक प्रश्न उरतो तो, श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाच्या उल्लेखाचा. जे कर्दळीवन आज दाखवले जाते त्याचा व श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाचा काहीही संबंध नाही. श्रीदत्तसंप्रदयातील थोर विभूती, प.पू.श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीवामनराज त्रैमासिकाच्या कार्तिक शके १९३५ च्या अंकामध्ये छापलेल्या 'कृष्णातिरीच्या वसणा-या' या प्रवचनात याविषयी खूप मौलिक माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी सदर प्रवचन आवर्जून वाचावेच. त्यात ते म्हणतात, " मूळ कर्दळीवन नामक दिव्य तपोभूमी ही प्रत्यक्ष श्रीदत्तलोकातच आहे, आणि त्या श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात जाण्याचा मार्ग हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगामधूनच सुरू होतो. त्या लिंगात योगबलाने प्रवेश केला असता तेथून थेट श्रीदत्तलोकातील त्या दिव्य कर्दळीवनात जाता येते.
श्रीदत्तसंप्रदायाच्या सांकेतिक भाषेत, स्थूलमानाने श्रीमल्लिकार्जुन लिंग आणि त्याभोवतीच्या साडेतीन कोस परिघाच्या परिसरालाच 'कर्दळीवन ' असे म्हणण्याचा प्रघात आहे! "
 
                ७. भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज वर वर्णन केलेल्या पध्दतीनेच श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात निघून गेले. लौकिक अर्थाने ते पृथ्वीतलावरून अदृश्य झाले. पण ज्यांना श्रीदत्तसंप्रदायाचे रहस्यच माहीत नाही; खरा संप्रदाय माहीत नाही असे लोक व्यर्थच पाताळगंगेच्या पैलतीरावरील अघोरी उपासना चालणा-या व त्याज्य मानलेल्या कर्दळवनाचा स्वतःच्या फायद्यासाठी सध्या खूप प्रचार-प्रसार करताना दिसत आहेत. कलियुगाचा विचित्र महिमा म्हणूनच की काय, अशा स्थानांशी अनेक दंतकथांचा संबंध जोडून आज शेकडो लोक भलत्याच कर्दळीवनाच्या यात्रा करीत आहेत.
 
                ८. सध्याच्या काळात कर्दळीवन यात्रा हा फार मोठा धंदा झालेला आहे. अनेक धूर्त लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. भोळ्या भाविक लोकांना भावनिक स्तरावर ब्लॅकमेल करून, त्यांच्या श्रध्देशी खेळून या यात्रेला येण्यासाठी भरीस पाडले जात आहे. एवढेच नाही तर, सरकारी अभयारण्य असलेल्‍या या कर्दळीवनाच्या विकासासाठी संघ, संस्था, गोशाळा इत्यादी स्थापून त्यांच्या नावावर देश-विदेशातून बख्खळ पैसा जमवला जात आहे. ही भाविक भक्तांची घोर फसवणूकच आहे. भाविकांनी असल्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये.
 
                ९. गेल्या एक-दोन वर्षात या कर्दळीवनाचे खोटेच माहात्म्य सांगणारे अनेक ग्रंथ बाजारात आलेले दिसतात. पध्दतशीर मार्केटिंग करून , लोकांच्या मानसिकतेवर वारंवार मारा करून या ग्रंथाच्या हजारो प्रती खपवल्या जात आहेत. लोकांच्या श्रध्देशी खेळून, त्यांची हकनाक दिशाभूल करुन आपली तुंबडी भरण्याचा हा हीन उद्योग किळसवाणाच आहे. अशा एकजात सर्व पुस्तकांमध्ये छापलेले अनुभव देखील अतिशय सामान्य स्तरावरील भावनिक व मानसिक खेळच आहेत. शास्त्रांच्या दृष्टीने त्यांना अनुभव देखील म्हणता येणार नाही. ते शुध्द कल्पनाविलासच आहेत. पण व्यवहारात जेव्हा अशा गोष्टी विविध माध्यमांमधून वारंवार समोर येतात, तेव्हा स्वाभाविक मानसिकता म्हणून मग लोकांना त्यात तथ्य असावेसे वाटू लागते. हीच पध्दत वापरून खोट्या नाट्या प्रसिध्दीचा पध्दतशीर अवलंब करून सध्या कर्दळीवन यात्रांचा धंदा तेजीत चालू आहे.
 
                १०. आज जे कर्दळीवन 'महान पवित्र ठिकाण' म्हणून दाखविण्यात येते. तिथे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कधीच गेलेलेही नाहीत. मग तेच श्रीस्वामी समर्थ म्हणून तेथून पुन्हा प्रकटले, हेही खोटेच ठरते. शिवाय ते स्थान अपवित्र, अयोग्य म्हणूनही मानलेले आहे. अशा ठीकाणी मोठ्या श्रध्देने यात्रा करून, प्रचंड कष्ट सोसून काय पदरात पडणार?  जंगलात निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर मग कर्दळीवनच कशाला हवे? इतरही जंगले आहेतच की !
 
                ११. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. श्रीदत्तसंप्रदायातील कारंजा, पीठापूर अशी स्थाने प्रथमतः प. प. श्रीमत् टेंब्येस्वामींनी शोधून काढली. कुरवपूर, नृसिंहवाडी, औदुंबर इत्यादी प्रमुख श्रीदत्तस्थानांचा विकासही त्यांनीच करवला. पण त्यांनी या कर्दळीवनाचा साधा उल्लेखही कुठे केलेला नाही आपल्या वाङ्मयात. ते आसेतुहिमाचल भ्रमण करीत असताना मल्लिकार्जुनाला गेले पण कर्दळीवनात अजिबात गेले नाहीत. म्हणजे जे स्थान त्यांना मान्यच नव्हते, त्याचे महत्त्व आजच्या या लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीची स्वत:हूनच ठेकेदारी घेतलेल्या तथाकथित बाजारबुणग्यांना जाणवले; असे म्हणायचे का? का या थोर (?) महाभागांचा अधिकार श्रीमत् टेंब्येस्वामींपेक्षा मोठा आहे? असल्या या तद्दन भंपकपणाला भाविकांनी अजिबात भीक घालू नये आणि कर्दळीवनाच्या यात्रांच्या फंदातही पडू नये, हीच कळकळीची विनंती !  प्रचंड हाल-अपेष्टा सोसून या कर्दळीवनात यात्रेला जाण्यापेक्षा घरी बसून केलेली यथाशक्य उपासना देखील जास्त लाभदायक ठरेल !
प.पू.श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या प्रवचनातून या भयंकर प्रकाराला सर्वप्रथम वाचा फोडलेली असून, फार मोलाची माहिती त्यात सांगितलेली आहे. भाविकांनी ती मुळातून वाचावी व असल्या भलत्याच यात्रांच्या भानगडीत पडून आपली आर्थिक, मानसिक आणि भावनिक फसवणूक करून घेऊ नये. यासाठीच अत्यंत तळमळीने हा लेखन-प्रपंच करीत आहे.
 
                १२. संतांच्या ग्रंथातील वरवर न समजणारी रहस्ये अधिकारी विभूतींकडूनच समजून घेतली पाहिजेत. विद्वान असेल पण सद्गुरुकृपा व संप्रदायोक्त साधना नसेल तर अशांच्या म्हणण्याला काडीची किंमत नसते. आज प्रचंड खप होणारी ही कर्दळीवनाबद्दलची सर्व पुस्तके भलतीच माहिती सांगणारी आहेत. त्यात संप्रदायाला धरून काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे उगीचच अशा भूलथापांना, कल्पनाविलासाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, ही सादर विनंती !
अशा कोणत्याही गोष्टींना, आपल्या सारासार विवेकाच्या मोजपट्टीवर व अधिकारी संतांच्या आधाराने तपासून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा, त्यातच आपले खरे हित असते  !
 
रोहन विजय उपळेकर
श्रीक्षेत्र दत्तधाम
द्वारा- श्री. श्रीराम नारायण जोशी
मु.पो. कोयनानगर, ता. पाटण
जि. सातारा - ४१५२०७
भ्रमणभाष- ८८८८९०४४८१

 

Thursday 24 April 2014

**** अनुभवाचे शास्त्र ****

   'शास्त्र' हा परवलीचा शब्द आहे. आपल्या ऋषीमुनींनी कसे वागावे? हे ज्यातून सांगितलेले आहे तेच धर्मशास्त्र. शास्त्र म्हणजे एखाद्या गोष्टीचे Science ! शास्त्राची चपखल व्याख्या सांगताना प. पू. श्री शिरीषदादा कवडे म्हणतात, " 'पूर्वी असे होऊन गेले, आता असे आहे व पुढेही असेच राहील'; हे अनुभव व विश्वासपूर्वक प्रतिपादन ज्यामधून होते तेच शास्त्र होय. शास्त्र हे काळानुसार बदलत नसते अथवा त्यात भरही पडत नसते."

       आपले पूर्वीचे ऋषी-मुनी, धर्मस्थापक थोर महापुरुष हे सगळे  अद्भुत ज्ञानी होते. आजच्या भाषेत सांगायचे तर ते थोर scientist होते. त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असल्याने त्यांच्या सांगण्याला विशेष महत्त्व असते. अशा महात्म्यांनी साधकांना किंवा परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्यांना येणाऱ्या अनुभवांचे शास्त्रच सविस्तर वर्णन करून ठेवलेले आहे.

     परमार्थ करीत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव हे येतातच. पण हे अनुभव खरेच भगवंतांच्या कृपेने आले का आपल्या मनानेच आपण त्यांची कल्पना केली? हे आपले आपल्याला सांगणे शक्य नसते. त्यासाठी थोर महात्म्यांना, आपल्या श्रीगुरूंनाच त्याबाबत विचारावे लागते. ते बरोबर ओळखतात की, हे कोणत्या प्रकारचे अनुभव आहेत व यांना साधनामार्गात कितपत महत्त्व द्यायचे. 

     अनुभवांचे स्वतंत्र शास्त्र असते. त्या विशिष्ट शास्त्रीय चौकटीत जर ती गोष्ट बसली तरच तिला खरा अनुभव म्हणतात. अन्यथा तो मनाचा किंवा भावनेचा खेळच असतो. अशा प्रकारच्या अनुभवांना  परमार्थामध्ये विघ्न मानलेले आहे. 

      सध्या जो उठतो त्याला श्रीस्वामीमहाराजांचा किंवा नवनाथांचा किंवा श्रीदत्तप्रभूंचा आदेश होताना दिसून येतो. यात तथ्य किती व भावनांचा खेळ किती? हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. पण आपण इतके तरी नक्कीच समजू शकतो की, श्रीस्वामीमहाराज, श्रीदत्तप्रभू हे काही एवढे सहज सोपे नाहीत की कोणालाही त्यांचे आदेश व्हावेत. श्रीस्वामीमहाराज हे साक्षात् परब्रह्म आहेत मग ते प्रत्यक्ष एखाद्याशी बोलायला त्याची केवढी पात्रता हवी? त्या पात्रतेची निदर्शक अशी कोणती लक्षणे दिसतात सदर व्यक्तीमध्ये? या सर्वांचा काहीच अभ्यास किंवा विचार न केल्यामुळे आपल्याला वाटते की एखाद्याला फार विलक्षण अनुभव येत आहेत. मग तो आपल्यासाठी  साक्षात् अवतारी महात्माच ठरतो. ही खरेतर आपलीच आपण स्वत: करून घेतलेली शुध्द फसवणूक आहे. अशा प्रकारची भलावण करणारे तथाकथित अवतारी लोक व त्यांच्यावर विश्वास ठेवणारे साधक, दोघेही नरकात जातात असेच संतांनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे.

     आजमितीस कर्दळीवनासंबंधी प्रकाशित झालेली जी काही पुस्तके माझ्या वाचनात आली, त्यांमध्ये शास्त्रांनी भावनेचे खेळ म्हणून सांगितलेल्या गोष्टीच, ' फार विलक्षण अनुभव ' म्हणून छापलेल्या पाहायला मिळाल्या. अशी स्वत:ची व पर्यायाने वाचकांची दिशाभूल करून काय पदरात पडणार? शेवटी भोळ्या भाविकांच्या श्रद्धेशी खेळल्याचे महापापच लागणार ना !

विविध माध्यमांमधून, प्रवचनांमधून किंवा अनुभवकथनाच्या नावाखाली अशा विपरित गोष्टींचा सतत भडिमार झाल्यामुळे, अननुभवी भक्त भ्रमतात आणि संमोहित झाल्यासारखे या पुस्तकांतील चुकीच्या माहितीलाच खरे समजू लागतात. त्याच गोष्टींचे गोडवे गाऊ लागतात. हीच माणसांची सामान्य मानसिकता बरोबर हेरून सध्या कर्दळीवन यात्रांचे जोरदार मार्केटिंग केले जात आहे. 

अनुभवाचे शास्त्रच माहीत नसल्यामुळे अशी फसगत होते. हे सध्याच्या काळाचे मोठे दुर्दैवच म्हणायला हवे !

Thursday 17 April 2014

** अनुभूती : समज - गैरसमज **

नमस्कार मंडळी,

" कर्दळीवन " या विषयावर आजमितीस भरपूर वाङ्मय बाजारात उपलब्ध आहे. अनेकांनी आपापली पुस्तके काढली आहेत, खास कर्दळीवन यात्रा कंपन्या पण आहेत. लोकांना यात्रेत आलेले अनुभव अशा पुस्तकांमधून वाचायला मिळतात. कोणी कोणी या विषयावर संशोधन करून काही नवीन माहिती प्रकाशित केल्याचा दावाही करतात.

दुर्दैवाने या सर्व पुस्तकांमधील फारच थोडी माहिती शास्त्रशुद्ध असल्याचे वाचताना सतत जाणवते. किंबहुना, दत्त संप्रदायाच्या तत्त्वपरंपरेला धरून आणि सांप्रदायिक मोजपट्ट्यांवर तपासून पाहिलेल्या माहितीचा यात पूर्ण अभावच आहे. भावनिक स्तरावर, कल्पनेच्या विलासातून निर्माण झालेल्या योगायोगाच्या चमत्कारसदृश गोष्टींना, घटनांना " दिव्य पारमार्थिक अनुभूती " म्हणता येत नाही. त्या केवळ भावनाच असतात आपल्या. मग कोणाला स्वामींचे दर्शन होते तर कोणाला दिव्य चैतन्य लहरी जाणवतात. कोणाला शांतता अनुभवाला येते तर कोणाला तेजाचे दर्शन होते. कोणाला सहज समोर आलेल्या एखाद्या श्वानामध्ये दत्तप्रभू दिसू लागतात तर कोणाला अचानकच काही आदेश होऊ लागतात. असल्या अनुभूती श्रद्धेची वाढ करतात असे म्हटले जाते. पण वस्तुत: हे सगळे कल्पनाविलासच असतात. परमार्थाच्या दृष्टीने यांची किंमत शून्य असते.

अशाच शेकडो अनुभवांनी ही सगळी पुस्तके भरलेली आहेत. या घटना परमार्थ तर वाढवत नाहीतच, उलट ज्याला अनुभव येतो त्याचा अहंकार आणि नाही येत त्याचा मत्सर वाढवण्यास कारणीभूत होतात. हे दोन्हीही भक्तीमध्ये फार घातक ठरतात.

या सर्व पार्श्वभूमीवर, कर्दळीवनाची वस्तुस्थिती श्रीदत्तसंप्रदायाच्या विशुद्ध  दृष्टीकोनातून प्रथमत: " श्रीवामनराज " या त्रैमासिकाच्या कार्तिक अंकात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्रीस्वामी समर्थ महाराज व प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी, श्रीवामनराज अंकातील " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या" या आपल्या प्रवचनात, सर्वात प्रथम कर्दळीवनाविषयीची खरी माहिती लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर माहिती नीट अभ्यासल्यास कर्दळीवनासंबंधीचे अनेक समज-गैरसमज पूर्णत: दूर होतील यात शंका नाही.

Tuesday 15 April 2014

***** कळकळीची विनंती *****

सर्व श्रीस्वामीभक्तांना सादर नमस्कार !

मी या लेखाद्वारे एका अतिशय महत्त्वाच्या व गंभीर बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे गुप्त होण्याचे व श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रकट होण्याचे स्थान म्हणून आंध्रप्रदेशातील " कर्दळीवन " या स्थानाचा सध्या खूप गवगवा केला जात आहे. अनेक भोळ्या भाबड्या स्वामीभक्तांना खोटी-नाटी माहिती सांगून भावनिक ब्लॅकमेल करून, त्यांची दिशाभूल करून, या कर्दळीवनाच्या यात्रेच्या नावाखाली भक्तांची आर्थिक, मानसिक व भावनिक फसवणूक सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे. अनेक पुस्तके छापून, त्यांच्या विविध भाषांतील आवृत्या काढून व भरमसाठ पैसे घेऊन कर्दळीवनाच्या यात्रा काढून त्यातून प्रचंड पैसे कमवण्याचा मोठा धंदा सध्या बोकाळलेला आहे. स्वामीभक्तांना यातील तथ्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच !

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात नाही तर श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृष्य होऊन श्रीदत्तलोकात प्रकट झाले होते. याला श्रीगुरुचरित्रात पुरावे आहेत. तसेच श्रीस्वामी समर्थ महाराज हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगांवी चैत्र शुद्ध द्वितीयेला इ.स. १०७१ मध्ये प्रकट झाले होते. श्रीस्वामीसुत महाराज त्यांचा जन्मोत्सव देखील साजरा करीत असत. या वर्णनानुसार श्री. नानाजी रेखींनी केलेल्या श्रीस्वामींच्या पत्रिकेला स्वत: श्रीस्वामी महाराजांनी मान्यता दिलेली होती.

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी व श्री स्वामी समर्थ महाराज हे जरी श्रीदत्तप्रभूंचेच अवतार असले तरी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाहता, ते पूर्णपणे भिन्न अवतार ठरतात. तसेच श्रीस्वामी समर्थ महाराज १०७१ मध्ये प्रकटले व श्रीनृसिंह सरस्वती तेराव्या शतकात. म्हणजे श्रीस्वामी समर्थ हे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्याही आधीपासून कार्यरत होते. त्यामुळे श्रीनृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले व ३०० वर्षे तपश्चर्या करून लाकुडतोड्याच्या निमित्ताने श्रीस्वामीरूपात प्रकटले, या कथेला कोणताही सांप्रदायिक आधार नाही. अनेक अधिकारी स्वामीशिष्य ही कथा पूर्णपणे कपोलकल्पितच मानतात.
आज जे कर्दळीवन दाखविले जाते, तो मूळचा वामाचारी बौद्ध तांत्रिकांचा व शाक्त कापालिकांचा अड्डा होता. आजही त्यांचे धागे-दोरे तेथे आहेतच. अशा स्थानांवर संन्याशांनी जाऊ नये, अशी शास्त्राज्ञा असताना हे दोन्ही दत्तावतारी महात्मे तेथे तपश्चर्या करण्यासाठी राहिले होते, ही गोष्ट पटण्यासारखी नाही.

कलियुगाचा महिमाच असा आहे की, त्यात खोट्या गोष्टींना सत्य मानले जाऊन ऊत येतो. कर्दळीवन प्रकरण हा त्याचाच नमुना असून आपल्या व्यावसायिक फायद्यांसाठी लुच्च्या लोकांनी त्याला खोटी प्रसिद्धी दिलेली आहे. आता तर त्या सरकारी अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या कर्दळीवनाचा विकास (?) करण्याच्या नावाखाली देश-विदेशातून भरमसाठ देणग्या मिळवून स्वत:ची तुंबडी भरण्याचाही भयंकर उद्योग काहींनी राजरोस सुरू केलेला आहे. श्रीस्वामी भक्तांनी असल्या कोणत्याही भूलथापांना, प्रलोभनांना बळी पडून कर्दळीवनाच्या निरर्थक यात्रा करून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, हीच कळकळीची विनंती.


वरील माहिती श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या प्रवचनातून घेतलेली असून पूर्णत: सत्य व दत्तसंप्रदायाला धरून आहे. जिज्ञासू वाचकांनी अधिक माहितीसाठी कृपया खालील संदर्भ आवर्जून वाचावेत ही विनंती.

1. " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या " - प्रवचन- प. पू. श्री. शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज त्रैमासिक कार्तिक अंक, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे-५१.
2. " कर्दळीवनाची वस्तुस्थिती " - लेख- रोहन उपळेकर, ग्रहसंकेत मासिक एप्रिल अंक, नवीन प्रकाशन, पुणे ३०. (ग्रहसंकेत मासिकात आलेला हा लेख "या इथे क्लिक केल्यावर वाचता येईल")

 सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती की, ही माहिती जास्तीतजास्त शेयर करून अधिकाधिक स्वामीभक्तांपर्यंत पोचवून, या सध्या चालू असलेल्या प्रचारकी फसवणुकीला हकनाक बळी पडण्यापासून वाचवावे ही प्रार्थना !

** प्रारंभिक **

नमस्कार मित्रहो, 
सध्या आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य जवळील कर्दळीवनाच्या यात्रांचे पेव फुटले आहे. जो उठतो तो कर्दळीवनाची यात्रा करून येतो आणि स्वत:ला परम भाग्यवान , धन्य समजू लागतो. अनेक लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. कर्दळीवनाचे नसलेले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी सेवा संघ, संस्था वगैरे स्थापून, त्यांच्या मार्फत दिशाभूल करणाऱ्या माहितीची पुस्तके छापली जात आहेत. त्या पुस्तकांचे पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल केले जाते व ही यात्रा करण्याचे त्यांच्या गळी उतरवले जाते. हा सगळाच भयंकर प्रकार पाहून जीव कासाविस होतो. 
वस्तुत: ह्या कर्दळीवनाला खरोखरीच एवढे महत्त्व आहे का श्रीदत्तसंप्रदायात? उपलब्ध पुरावे व संतांच्या चरित्रातील संदर्भ पाहता, सध्याच्या कर्दळीवनाला कोणताच भक्कम आधार सापडत नाही. उलट या कर्दळीवनात जाण्याचा निषेधच सांगितलेला बघायला मिळतो दत्त संप्रदायाच्या वाङ्मयात. तसेच पूर्वीचे कोणाीही थोर दत्त सांप्रदायिक महात्मे या कर्दळीवनात गेल्याचा उल्लेखही सापडत नाही. 
या कर्दळीवनासंदर्भातील सगळी पूर्ण सत्य माहिती या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. जुन्या ग्रंथांतील व दत्त सांप्रदायिक महात्म्यांनी सांगितलेली या बद्दलची माहिती लोकांसमोर आणण्याच्या आमच्या या निरपेक्ष प्रयत्नाला , आपणां सर्वांचे सहकार्य निरंतर अपेक्षित आहे. हळूहळू या विषयाबद्दलच्या माहितीचे भरपूर संदर्भ ब्लॉगवरून देण्यात येतील. कृपया ही माहिती जरूर वाचावी व आपल्या परिचितांनाही ही माहिती देऊन असल्या फसवणुकीतून सर्वांची सोडवणूक करावी ही विनंती.

- रोहन उपळेकर